मुलांच्या हातात कोयते देणार्‍या ‘आकां’वर कारवाई : मुख्यमंत्री   

मुंबई, (प्रतिनिधी) : पुण्यात कुठलीही संघटित कोयता गँग नाही. मात्र, अल्पवयीन मुलांच्या हातात कोयते देऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न काही गुन्हेगार करतात. अल्पवयीन मुलांवर कठोर कारवाई करता येत नाही. पण, आयपीसी मधील तरतुदींचा वापर करून अल्पवयीन मुलांचा वापर करणार्‍या गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बापूसाहेब पाठारे यांनी काल विधानसभेत पुण्यातील कोयता गँग संदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात कोणतीही कोयता गँग नाही, हा प्रसारमाध्यमांनी तयार केलेला शब्द असल्याचे सांगताना, काही सराईत गुन्हेगार अल्पवयीन मुलांच्या हातात कोयते देऊन दहशत माजवत असल्याच्या घटना समोर आल्याचे  त्यांनी सांगितले. अल्पवयीन मुलांवर कायद्याने कठोर कारवाई केली जाऊ शकत नाही. याचाच फायदा घेण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. मात्र, आता कायद्यात सुधारणा झाली आहे. अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यासाठी वापर करणार्‍यांवर तो गुन्हा त्यांनीच केला आहे, असे गृहीत धरून कारवाई करता येते. त्याचा वापर केला जाईल. तसेच अशा गुन्ह्यात वापर झालेल्या अल्पवयीन मुलांसाठी दिशा ही योजना सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी विश्वात आणण्यासाठी अमली पदार्थांचा वापर होत असल्याची बाब निदर्शनास आणताना चेतन तुपे यांनी नायजेरियन नागरिक अमली पदार्थ विकत असल्याची माहिती दिली. त्यावर अमली पदार्थांच्या बाबतीत सरकारची भूमिका अत्यंत कठोर आहे. विदेशी नागरिकांवरील गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत त्यांना मायदेशी हाकलता येत नाही, पण त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉनिक  ट्रॅकर लावता येईल का? याची चाचपणी करू असे फडणवीस यांनी सांगितले. पुण्यातील सीसीटीव्हीच्या देखभालीबाबत ही महिनाभरात निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
 

Related Articles